४७. सुखाचे आगर, संतांचे माहेर...

सुखाचे आगर प्रेमाचा सागर

संतांचे माहेर पंढरपूर.

दिंडी पताका पालखी पादुका

संतांच्या कौतुका पार नाही.

रामकृष्ण हरी मुखाने बोलती

वाट ही चालती पंढरीची.

वारकळी मेळा पंढरीत गोळा

आनंदसोहळा जीवनाचा.

भजन-कीर्तन अभंग-गौळण

भारूड-प्रवचन वाळवंटी.

टाळांचा गजर वीणेचा झंकार

मंत्राचा जागर रात्रंदिस.

रिंगणी रंगला काया-वाचा-मने

कीर्तनात नाचे वारकरी.

आनंदाचा कंद मन होई दंग

बोलतो मृदंग पांडुरंग हरी.

जीवीचा जिव्हाळा भक्तीचा सोहळा

विरक्त वेल्हाळा पांडुरंग.

पुंडलिकाभेटी पब्रह्म आले गा!

पाहूनी विठ्ठला भान हरपले.

पंढरीचा महिमा काय वर्णु देवा !

कैवल्याचा ठेवा पांडुरंग.

संतांचा हा वाली अनाथांचा नाथ

रुक्मिणीचा कांत पांडुरंग.

२९.६.१९९८
सोलापूर, प्रसिद्धी : दै. संचार, आषाढी एकादशी, १९९९
अनुक्रमणिकामागीलपुढील
४७. सुखाचे आगर, संतांचे माहेर... | सृष्टीचे हे रूप आगळे