१. मन पाखरू पाखरू

मन पाखरू पाखरू
त्याला किती हो आवरू?
झणी दूर दूर पळतसे
त्याला कसे मी सावरू?

मन अवखळ वारा
जसा चंचल तो पारा
धरवेना हातामध्ये
जसा भिंगरीचा आरा

मन वेगवान वारू
त्याला कसे मी धरू?
झणी लागे हो बावरू
सांगा काय हो मी करू?

मन गगनात फिरे
जसे भरारणारे वारे
कसे रानोमाळ फिरे
जशी मोकाट वासरे

मन लाजरे बुजरे
कधी होते निलाजरे
रंग दाविते गहिरे
त्याचे छत्तीस नखरे

मन वेडे असे कसे?
त्याला लागले हो पिसे
क्षणोक्षणी बदलतसे
मावळतीचे रंग जसे!

३.६.२००४, बुधवार
अनुक्रमणिकापुढील
१. मन पाखरू पाखरू | भाव मनीचे उमलत राहो