६३. स्मृतिफुले
अनेक शतके लोटली
असं सांगतात की,
व्यासपीठावरून व्यासांनी सांगितली,
'महाभारता'ची गूढकथा.
आणि 'रामायण' घडण्यापूर्वीच
वाल्मिकीने लिहिली
'रामायणा'ची दीर्घकथा.
ज्ञानेशाचा रेडा वदला
वेदांमधल्या ऋचा, तुकयाची वाणी गातच राहिली
गोड-रसाळ अभंगगाथा.
दासांनी रचिला 'दासबोध'
नीतीच्या तत्त्वावर, आणि
युगानुयुगे करीत आहे विरागी मीरा
श्रीकृष्णाची भक्ती.
तिच्या हरेक भजनात असते उक्ती
'मीरा के प्रभु गिरिधरनागर'...
⁘ ⁘ ⁘
सारे कवी, चित्रकार रंगवतात
नि भक्तगण, रसिक रंगून जातात
श्रीकृष्णाच्या-गोपगोपींच्या
रंगदार नि ढंगदार गौळर्णीत.
संत-महंत, भक्त-दासांनी
कबी, चित्रकार, रसिक जनांनी,
बगळली नाही
देवदासी कान्होपात्रा, गणिका महानंदा,
गौतमी अहल्या, धूर्त पांडवी,
रथगामी रुक्मिणी, हरिश्चंद्राची तारामती,
भूमिकन्या सीता...
ह्या साऱ्यांची गायिली महती,
म्हटली गाणी, रचिली कवने...
पण... पण... देवादिकांच्या,
संतमहंत आणि ऋषिमुनींच्या, जनताजनार्दनाच्या
न्यायी नजरेतून कशी निसटली
राजकन्या असून झालेली दासी
त्यागमूर्ती शर्मिष्ठा?
चौदा वर्षे पतिवियोग साहणारी
निष्काम कर्मयोगी-उर्मिला?
शामसावळ्यावर निःसीम प्रेम करणारी
अष्टावक्रा काळी कुब्जा?
अवघे संत-महंत, कवी-चित्रकार
या महासींना कसे विसरले?
का? कसे?
साऱ्यांनी दुर्लक्षिले,
पण नियतीनेच सांगितले आहे की,
जिवंत जीवन वाहत असते पाषाणातून!
याच न्यायाने
या उपेक्षित सींना विसरला नाही
एक सच्च्या मनाचा माणूस.
⁘ ⁘ ⁘
युगानुयुगे पुराणांची पाने उलगडीत असलेला
पुराणपुरुष
अखंडपणे सांगत राहिला नुसते पुराणच!
भारत-पुराण संस्कृतीचा,
जुन्या-नव्याचा संघर्ष, नि कोलाहलातून
खांडेकरांना ऐकू आली
शर्मिष्ठठेची मूर्त हाक!
यंत्रयुगात सदान् कदा गुरफटलेल्या मलिन मनात
त्यांनी जागविली सार्थ ज्योत!
हजारो वर्षे रामायणाच्या कथन-श्रवणाच्या
माऱ्याने गुदमरलेली त्यागमयी उर्मिला.vतिच्या मूक व्यथेला वाचा फोडली...
हिन्दी साहित्यिक, मैथिलीशरण गुप्त यांनी!
आणि
दह्यादुधाने भरलेल्या, वनश्रीने नटलेल्या,
आनंदी आनंद असलेल्या गोकुळातच
जी पडली होती एका कोपऱ्यात
त्या कुब्जेला
जनलोकात आणली गडकऱ्यांनी!
⁘ ⁘ ⁘
असेच म्हणावे वाटते शेवटी,
आहेत जोपर्यंत या भूस्थलावर
शमा, उमा नि कुब्जा,
होणार नाही त्यांचा, त्यांच्या हयातीत
या मर्त्यलोकात गाजावाजा.
स्मृती त्यांची अशी लोपते
विस्मृतीच्या गर्तेत...!
आणि मग नंतर पुन्हा
गडप झाल्यावर काळाच्या उदरात
लोटल्यावर वर्षे अनेक
सारे जग गुणगान गाते,
उदो उदो करते त्यांचा, त्यांच्या हयातीनंतर
त्यांच्या मागेच.
असा कसा हा न्याय म्हणावा!
दुनियेचा की नियतीचा?
नाही पर्वा जितेपणाची
फुले समाधीवरी स्मृतींची!