मनोगत
१९४५ ते १९५५ चा काळ होता तो. त्यावेळी मी उस्मानाबादला होतो. तेव्हा पेठेत मेळे व्हायचे. पांडुरंग दरबारमध्ये (मंदिरात) मेळे व्हायचे. त्या मेळ्याचे नाव होते 'महाराष्ट्र मेळा.' मीही मेळ्यात भाग घेत असे. मेळ्यात शीतल कांबळे या नावाचा मुलगा गाणी म्हणत असे व मुलींमध्ये इंदू सुलाखे नावाची मुलगी गाणी गात असे.
तेव्हा गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर यांची भावगीते ऐकायला मिळत. वाटवे यांचं एक गाणं त्यावेळी मला तोंडपाठ होतं, ते गाणं होतं - 'कसा ग गडे झाला कुणी ग बाई केला राधे तुझा सैल अंबाडा?' मी सहावीत होतो तेव्हा.
कसब्यामध्ये राममंदिरामध्ये सन्मित्र मेळा होता. त्या मेळ्यात सुधा चतारे नावाची मुलगी छान छान भावगीते आपल्या गोड आवाजात म्हणायची. 'रामाहृदयी राम नाही' आणि 'प्रेम तुझ्यावर करिते मी रे' या गाण्यांना वन्स मोअर मिळायचा.
१९५० मध्ये माझ्या भाचीचं लग्न होतं. मी एक मंगलाष्टका तयार केली होती, ती अजूनही आठवतेः -
भाग्याने मिळतो वसंत वर हा, सुशीला तुला चांगला
नामे सुशीला, गुणेही सुशीला, वधु ही वसंता तुला
ही मंगलाष्टका दिवाकर महामुनी या तरुणाने आपल्या गोड आवाजात चांगली म्हटली, सर्वांना आवडली. तेव्हापासून मला मंगलाष्टका तयार करून द्या, असे लोक म्हणू लागले. मुला-मुलींची, आईवडिलांची नावे घ्यायची व मंगलाष्टका लिहायची. मला छंदच लागला. मला कविता सुचू लागली. पहिली कविता आहे:-
कोणे एकेकाळी होती वहिनी लक्ष्मणाची
आहे मलाही वहिनी कृष्णा नावाची
ही कविता मी कुणालाही दाखवली नाही. फक्त इर्लेकरबाईंना दाखवली. सौ. सुहासिनी इर्लेकर या मूळच्या सोलापूरच्या. पण लग्नानंतर त्या उस्मानाबादला आमच्या वाड्यासमोरच राहायला आल्या. त्याही कविता लिहीत होत्या. मला वाचायला देत होत्या. अशा प्रकारे प्रेरणा मिळत गेली. मी कविता लिहू लागलो. इर्लेकर बाईंना दाखवत होतो. त्या वाचून त्यात दुरुस्ती सांगायच्या.
१९५९ साली मी सोलापूरला आलो. सोलापूरला तेव्हा मी लष्करला राहत होतो. संध्याकाळी दूध डेअरीकडे फिरायला जाऊ लागलो. तिकडे अजून वसती, सोसायट्या काही नव्हतं. रेवणसिद्धेश्वर, कंबर तलाव सारं अगदी स्पष्ट दिसायचे. तिकडे रहदारीच नव्हती. उगवणारा सूर्य, मावळणारी संध्याकाळ, संध्याकाळी पश्चिमेकडील आकाशात निरनिराळे रंग दिसायचे. मला ते पश्चिमेकडील रंग खूप आवडायचे. निसर्गकविता सुचत गेल्या. मी लिहीत गेलो. नंतर प्रापंचिक कविता, प्रेमाच्या, विरहाच्या, प्रासंगिक कविता सुचत गेल्या. तसेच डॉ. आंबेडकर, जोतिबा फुले, चार हुतात्मे यांच्या जीवनावर सुचत गेले, लिहीत गेलो. १९६० साली भगिनी समाज मंडळ - त्या हॉलमध्ये मोठे कविसंमेलन भरले होते - मोठमोठे मान्यवर कवी आले होते. वसंत बापट, ग. ल. ठोकळ, विंदा करंदीकर, शांता शेळके, इंदिरा संत, संजीवनी मराठे, बा. भ. बोरकर, कवी सुर्वे असे मान्यवर कवी होते. त्यांच्या कविता त्यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्या. माझे भाग्यच की! मोठी मेजवानीच वाटली मला.
२००३ साली माझा पहिला कवितासंग्रह (ज्ञानेश्वरांचा जीवनपट) 'गीत ज्ञानदेवायन' याचे प्रकाशन सोलापुरात स्मृतिमंदिरामध्ये जिल्हा साहित्य संमेलनात झाले. हे पुस्तक डॉ. शे. दे. पसारकर व सौ. उषा पसारकर यांनीच छापून दिले होते. मुखपृष्ठ, बांधणी, सजावट हे सारं त्यांच्याच कल्पनेतून साकार झालं होतं. पसारकर सरांचं मोलाचं सहकार्य तेव्हा प्रथम लाभलं. 'गीत ज्ञानदेवायन' या पुस्तकातील गीतं लोकांपर्यंत पोहचायला कारणीभूत झाले माझे पुतणे जयकुमार नायगावकर हे. त्यांनी लातूरचे गायक मधुसूदन कोटलवार यांना ते पुस्तक दिले, गीते चालींवर बसवायला लावली व २००९ मध्ये नांदेडला डिसेंबरमध्ये त्या गाण्यांचा पहिला कार्यक्रम जयकुमार यांनी घडवून आणला. सोलापूरला येऊन मला नांदेडला कार्यक्रमासाठी घेऊन गेले. काय त्यांचा जिव्हाळा, धडपड, जिद्द! ते म्हणायचे, काका तुमच्या कविता-गीतं मी लोकापर्यंत पोहचवणार! हे त्यांनी करून दाखवलं. त्या गाण्याचा उस्मानाबादलाही कार्यक्रम झाला.
आज माझी तीन पुस्तके प्रकाशित होत आहेत. छपाई, मुखपृष्ठ सारं सारं श्री. व सौ. पसारकर यांचंच आहे. त्यांचे अमोल सहकार्य लाभले म्हणूनच आज प्रकाशन समारंभ होत आहे. हे तीन कवितासंग्रह छापण्याबाबत पुढाकार घेतला माझा नातू मयूर दीक्षित याने. तो म्हणायचा, 'चला आपण जाऊ पसारकर सरांकडे. त्यांना भेटू, विचारू!' एकदा तो घेऊनच गेला मला सरांच्या घरी, तेथून चालना मिळत गेली व आज या तिन्ही कवितासंग्रहाचं प्रकाशन होत आहे.
तसेच आणखी एक उल्लेख नाही केला तर मी कृतघ्न ठरेन. माझी पत्नी सौ. कुंदा हिचा यात मोलाचा वाटा आहे. आर्थिक सहकार्य तिचेच आहे. माझी सून नीता हिचे प्रोत्साहन आहे. म्हणूनच आजचा प्रकाशनाचा दिवस उगवला. जाणता-अजाणता अनेक हितचिंतकांचे हात या प्रकाशनाला लागले आहेत. त्या सर्वांचा मी ऋणी आहे. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी सविस्तर व छान प्रस्तावना दिली आहे. तसेच उस्मानाबादच्या श्रीमती कमलाताई नलावडे यांचा अभिप्रायही मोलाचा आहे. या दोघांचेही आभार.