अभिप्राय
पंडित नायगावकर यांचा कवितासंग्रह वाचनात आला. कवीने १९५५ सालापासून कविता लिहिण्याचा छंद बाळगलेला आहे. खूप मोठा कालखंड कविता बाचत असताना जाणवतो. कविमन श्रद्धाळू आहे. आपला सांस्कृतिक ठेवा जतन करणारे आहे. अनेक कवितांतून कवीचे राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य, समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती यांच्याविषयी आदरभाव, भक्ती, निष्ठा दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिराव फुले यांच्या कविता व्यक्तिकार्य म्हणून चांगल्या आहेत. कितीतरी कविता सुंदर चालीवर म्हणता येतील अशा आहेत. छंद, राग, अनुप्रास, यमक यांचे चांगले भान कवीला असल्यामुळे कविता गाता येतात.
दीपावली, बाळ, माता या विषयांवरील कविता कवितासंग्रहात बऱ्याच आल्या आहेत. आपला सांस्कृतिक ठेवा जपावा हा हेतू कदाचित कवीचा असावा. आई, मूल, प्रेम-अभिव्यक्ती खूप छान वर्णिली आहे. मातृप्रेमाची विशालता, निरलसता, निर्व्याज प्रेम अधिक दिसून येते.
प्रेम, प्रणय, सखा, पती यांवरील कविता चांगल्या आहेत. कवी या कवितांमधून सुद्धा निरपेक्ष प्रेम, त्याग, समर्पण दाखवतो. प्रेमातील आतुरता कवीला योग्य प्रकारे पकडता आलेली आहे. आज त्यातील काही कल्पना जुन्या वाटतात, हे खरे आहे. काही कविता अनुकरणातून आल्या आहेत असे वाटते.
एकूण कविता चांगल्या आहेत. कवितासंग्रह काढण्यासाठी कवीला मनःपूर्वक शुभेच्छा!