१. सांगते इंद्रायणी ही कथा !
महाराष्ट्र देश म्हणजे संतांची पुण्यपावन नगरी.
संत जन्माला आले म्हणून आपल्या मनावर सुसंस्कार झाले. संतांची वाणी ही अमर वाणी होऊन अभंगांच्या रूपाने जनीमानसी रुजली. संतांनी केवळ उपदेशाचे डोस जगाला दिले नाहीत, तर 'आधी केले मग सांगितले' ही त्यांची नीती होती. त्यांनी भारतीय संस्कृतीची पताका फडकवली. त्यांचे पवाडे गावे तरी किती !
त्यावेळच्या विशिष्ट सामाजिक पद्धतीमुळे, सर्वसामान्य समाजाची मुस्कटदाबी होऊ लागली. त्यांना कुणी त्राता उरला नाही. धर्माच्या आणि श्रेष्ठाश्रेष्ठतेच्या वादविवादात एक अहंमन्य समाज स्वतःला श्रेष्ठ समजून बहुजन समाजाला तुच्छ मानीत होता.
इथून तिथून सर्व समाज एक आहे, मानवता धर्म श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी संतांनी टाहो फोडला. पण पिढ्यान् पिढ्या लोकांच्या मनावर लादलेले अंधश्रद्धेचे ओझे सहजासहजी कसे झुगारले जावे? अज्ञानाच्या अंधारातून चाचपडत जाणाऱ्या बहुजन समाजाला सातशे वर्षांपूर्वी उजेड दाखविला. हा ज्ञानदीप अजून तेवत आहे. नव्हे, 'यावश्चंद्रदिवाकरौ' तेवत राहणार आहे.
ज्ञानेश्वर माऊलीचा साद्यंत इतिहास जाणून घेण्यासाठी चला तर इंद्रायणीकाठी ! इंद्रायणीच्या परम पावन जळात काय दिसते, ते आपण पाहूया. थांबा, या इंद्रायणीशी जरा हितगूज करूया.
आपल्या लयीत ती काय गुणगुणते आहे, ते लक्ष देऊन ऐकूया. सातशे वर्षांपूर्वी तिच्या काठी घडलेली कहाणी, ती आपल्याच शब्दांत सांगते आहे...
गतकाळातील आज आठवे भावआगळी व्यथा
सांगते इंद्रायणी ही कथा ! ।। ध्रु. ।।
दयाघनाच्या नयनांमधुनी
करुणामय मम धार वाहते
स्वर्गामधुनी अशी अवतरे अवनीवरती स्वतः
सांगते इंद्रायणी ही कथा... ।।१।।
इथेच झाले ते शुभमंगल
शिवशक्तीसह आदिमायेचे
भाग्य लोपले दोन जीवांचे उरली जीवनव्यथा
सांगते इंद्रायणी ही कथा... ।।२।।
तेजच अवघे दिव्यत्वाचे
ब्रह्मा, विष्णू, महेश साचे
मुक्ताई तर स्वयं प्रभेची समूर्त विद्युल्लता
सांगते इंद्रायणी ही कथा... ।।३।।
मार्तंडांच्या क्लेशापायी
निजबाळांना करुन पोरके
माझ्या डोही विलीन झाले पापभिरु ते स्वतः
सांगते इंद्रायणी ही कथा... ।।४।।
अशी कहाणी इथेच घडली
मुक्या मनाने किती वदावी
शब्दांमधली भावफुले ही मीच अर्पिली स्वतः
सांगते इंद्रायणी ही कथा... ।।५।।