२. झाली सकाळ हो झाली

  आळंदी-इंद्रायणी ही संतांची, वारकऱ्यांची, माळकऱ्यांची, तुमची आमची सर्वांचीच. आळंदी आणि इंद्रायणी ही एकरूप झालेली. भिन्न निर्जीव असली तरी सजीव भासणारी बोलकी प्रतिमेच !

  इंद्रायणी चार-साडेचार वाजता जागी होते. नित्य नियमाने आळंदीतील ब्रह्मवृंद इंद्रायणीत स्नान करतो आहे. पूर्वक्षितिजावर दिसणाऱ्या आरक्त बिंबाला मनोभावे अर्घ्य देतो आहे. सूक्तांचे, रुद्रांचे प्रातःसमयी, नामस्मरणाचे जयघोष चालले आहेत. त्यामुळे साऱ्या वातावरणात मांगल्य भरून राहिले आहे.

  इथला निसर्गही मंगलमय भासतो. पूर्वक्षितिजावर अरुणराज मोठ्या डौलाने, मुक्त हस्ते गुलाल उधळीत येत आहे. त्याला पाहून वृक्षवेली हसत आहेत. फुलांच्या गंधाने वाराही गंधित होऊन हसतो आहे. साऱ्या वातावरणात सात्त्विक आनंद भरून राहिला आहे. पाने-फुले आपसात बोलू लागली आहेत...

आनंदाने तरुवर फुलले पूर्वदिशा हासली
वायूसंगे सुगंध उधळीत पर्णफुले बोलली
झाली सकाळ हो झाली... ।। ध्रु. ।।

गिरिशिखरावर दिसू लागले तेजःपुंज निशाण
आनंदाने द्विजगुण अवघे गाऊ लागले गान,
नभी उडाला विहंगमेळा घेत अनोखी तान
गोमातेच्या गळ्यात अवचित घाटी किणकिणली
झाली सकाळ हो झाली... ।।१।।

मंगल घट ते घेऊन हाती सुवासिनी चालल्या
शुभंकर ते चरण चुंबिती जळातल्या पायऱ्या
मित्रामाजी अर्घ्य देऊनी दूर जात सावल्या
मंदिरातल्या आरतीसवे गजघंटा गर्जली
झाली सकाळ हो झाली... ।।२।।

अवनीवरच्या पावन क्षेत्री आळंदी वसली
आपेगावचा योगी पाहुन मनोमनी हसली
इंद्रायणीच्या भेटीसाठी गोदावरी आली
सिद्धेश्वरच्या भेटीमाजी भक्ती ओळंगिली
झाली सकाळ हो झाली... ।।३।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
२. झाली सकाळ हो झाली | गीत ज्ञानदेवायन