३०. स्वानंद समाधी घेतली निवांत

  कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१४. आळंदीत इंद्रायणीकाठी भक्तजनांचा अपार मेळा जमला आहे. सारेच भावविभोर झाले आहेत. इंद्रायणीही शांत शांत आहे. तिने आपला खळखळ आवाज थांबवला आहे जणू!

  निवृत्तीला व सोपानाला भरून आले. मुक्ताईच्या डोळ्याला तर खळ नव्हता. ज्ञानराजा निवृत्तीच्या- गुरूच्या पाया पडण्यासाठी वाकला तोच निवृत्तीने त्याला तसाच धरून गच्च मिठी मारली. निवृत्तीला भरून आले होते. पण ज्ञानरायाच्या मुखावर समाधान आहे, तो आनंदात आहे, साऱ्यांचा निरोप घेतो आहे.

  सिद्धेश्वराच्या नंदीची शिळा बाजूला करण्यात आली. सगळ्यांनी ती जागा स्वच्छ केली. तुळशी व बेलाची पाने अंथरली. फुले पसरली.

  ज्ञानराज- सर्व संतांचा शिरोमणी हा कैवल्याचा पुतळा, शांतपणे एकेक पायरी उतरत ते आत गेले. आसनावर बसले. डोळे मिटलेले, चेहेऱ्यावर शांत भाव.

  बघता बघता शिळा लागली. सर्व संतमेळा स्तब्ध झाला. शांत अबोल झाला. ओठातून शब्दही बाहेर येईना.

  कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानसूर्य, जगाला प्रकाश देणारा हा ज्ञानरवी मावळला. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. इंद्रायणी संथ लयीत गाऊ लागली....

स्वानंद समाधी घेतली निवांत लाभला एकांत ज्ञानिया हो...।। ध्रु. ।।

जाहले हो काज येथले हो आज
उकलले गुज कैवल्याचे !
भक्तीचे हो मळे येथ बहरले
अमृतात न्हाले अवघे जन... ।।१।।

जड चैतन्याचा विचार करोनी
ज्ञान आणि कर्म योग जाणा
सर्वही त्यजूनी निष्काम ते कर्म
सेवेचा हो धर्म यज्ञ आता... ।।२।।

आदि आणि अंत धर्म, अर्थ, काम
तरीही अनाम सर्व मीही
सत्त्व-रज-तम अलिप्त मी... ।।३।।

चुकविला फेरा जन्म-मरणाचा
एक मार्ग साचा ज्ञानकर्म
मुक्त होय आता तोड बंधनाते
ओळखा अनंते अंतरात... ।।४।।

निर्गुण तो आहे सर्व निराकार
सृष्टीरूप विस्तार साकारतो
रूप हे विराट आजि पाहियेले
नवल देखिले विश्वरूप... ।।५।।

झाले निरूपण योगक्षेम आता
त्रैलोक्याचा त्राता साद घाली
आनंदाचे धाम सज्जनाचे मन
उद्धरिले जन सर्व लोकी... ।।६।।

जीविताचे गूढ दावी उकलून
ओवीतून सांडे भक्तिरस
आळशाच्या दारी ज्ञानगंगा आली
पावन जाहली तिन्ही लोकी... ।।७।।

विठ्ठल विठ्ठल गजर होतसे
मुक्त तेज होय कैवल्याचे
टाळ-चिपळ्यांची साथही मिळाली
एकरूप झाली एकतारी... ।।८।।

शिळाही लागली देखता देखता
समाधी लागता उजळे दीप
अबीर नि बुक्का, फुले उधळिती
कर हे जुळती आपोआप... ।।९।।

पंढरीचा राणा आळंदीस आला
पाहूनि सोहळा धन्य झाला
इंद्रायणीकाठ भिजे आसवात
होय अंतरात कासाविशी... ।।१०।।

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

अनुक्रमणिकामागील
३०. स्वानंद समाधी घेतली निवांत | गीत ज्ञानदेवायन