२९. कैवल्याचा पुतळा

  ज्ञानदेव समाधी घेणार, ही वार्ता सर्व भक्तमंडळीत पसरली. दिवस ठरला. कातिक वद्य त्रयोदशी, शके १२१४.

  जड अंतःकरणाने सर्वांनी आळंदीला प्रस्थान ठेवले. इंद्रायणीकाठी सगळे सगळे गोळा झाले. हा कैवल्याचा पुतळा पुन्हा दिसायचा नाही. साऱ्यांना अपरंपार दुःख झाले. निवृत्तिनाथ हे बंधू, पण ज्ञानियाचे गुरू. ते मूकपणे म्हणू लागले...

कैवल्याचा पुतळा माझा, ज्ञानदेव राजा
निजधामाला आज चालला, संपवुन काजा...।। ध्रु. ।।

बंधू माझा धाकलाच तू, आज पुढे जाई
संजीवन समाधीची का तुजला रे घाई?
असा कसा रे उदार झाला जिवावरी राजा?... ।।१।।

बरे जाहले आज वाटते नाही तात-माई
गुरूस टाकुन आज एकला शिष्य पुढे जाई
असा शिष्य रे जगाआगळा, जाण तूच मनुजा... ।।२।।

समाधानी अन् स्थितचित्त तू, हास्य मुखावर
परि वियोगे आज येथले कासाविस अंतर
अंतरात ही स्मृती निरंतर तुझी ज्ञानराजा... ।।३।।

सोपानाला अन् मुक्ताईला सांग जरा काही
त्या दोहोच्या अंतरातला भाव मुक्त वाही
भावुकतेला पूर लोटला आज तिन्ही सांजा... ।।४।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
२९. कैवल्याचा पुतळा | गीत ज्ञानदेवायन