मनोगत
ज्ञानेश्वरांची जन्मशताब्दी गावोगावी मोठमोठ्या शहरी साजरी होऊ लागली. मंदिरात, मोठमोठ्या पटांगणात मंडप घालून प्रवचनं, कीर्तनं होऊ लागली. ज्ञानेश्वरांची सातशेवी जन्मशताब्दी साजरी करण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्यामुळे याला आगळे महत्त्व प्राप्त झाले.
सोलापुरातील मित्रनगर, नगरेश्वर मंदिर, दमाणी नगर, लष्करातील राममंदिराजवळील पटांगण, अशा अनेक ठिकाणी प्रवचनं, कीर्तनं होऊ लागली. रात्ररात्र टाळमृदंगाचा गजर कानात घुमू लागला.
डॉ. यू. म. पठाण, डॉ. निर्मलकुमार फडकुले यांची 'ज्ञानेश्वरी'वर व ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील भाषणे ऐकून कान तृप्त झाले. तसेच मुकुंद महाराज पाथर्डीकर, धुंडामहाराज देगलूरकर, सातारकर महाराज यांची प्रवचने ऐकण्याचा योग आला.
माझे सहकारी, मित्र व गायनशिक्षक मनोहर कुलकर्णी यांनी मित्रनगरमधील आप्पासाहेब कुलकर्णी याची भेट घडवून आणली. आप्पासाहेब हे 'ज्ञानेश्वरी'चे गाढे अभ्यासक. ते म्हणाले, "सेवाभावनेने तुम्ही ज्ञानेश्वरांवर कविता लिहा. कवितेच्या रूपाने तुमची सेवा ज्ञानेश्वरांच्या चरणी रुजू होऊ द्या."
ज्ञानेश्वरांसारख्या महान संतावर मी कविता कशी लिहिणार? असे मला वाटायचे. आप्पासाहेबांचे बोलणे ऐकले नि माझ्या मनावरचे दडपण कमी झाले.
घरी आलो नि साखरे महाराजांची 'ज्ञानेश्वरी' वाचायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरांची 'ज्ञानेश्वरी' म्हणजे रत्नांचे भांडारच जणू! ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील मिळतील ती पुस्तके मी वाचू लागलो. पद्माकर गोवईकरांचं 'मुंगी उडाली आकाशी' हे पुस्तक वाचताना एकेक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता.
रात्री प्रवचने ऐकायची व दिवसा पुस्तके वाचायची. मला झपाटल्यासारखे झाले. ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील एकेका प्रसंगावर कविता सुचत होती. इंद्रायणीकाठी घडलेली कहाणी इंद्रायणीच सांगते आहे असा मला भास होत होता.
एक निवेदन आणि एक कविता असे सर्व 'गीत ज्ञानदेवायन' २५ दिवसांत लिहून झाले.
ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील हे काव्य मी कसे लिहून गेलो याचा माझा मलाच अचंबा वाटतो.
ज्ञानेश्वरांचा मळा बहरलाय. त्यातील हाताला येतील ती फुले मी हारात गुंफली व ती माळ ज्ञानियांचा राजा, शब्दसृष्टीचे ईश्वर यांचे चरणी वाहिली.
श्री. आप्पासाहेब कुलकर्णी व मनोहर कुलकर्णी यांच्या प्रेमाचा ससेमिरा, माझे सर्व बंधू यांचे प्रेरणेचा, प्रेमाचा उल्लेख आवर्जून करायला हवा.
माझे मेव्हणे श्री. विजयकुमार दीक्षित यांचे प्रयत्न व प्रेरणा पाठीशी आहेत. औरंगाबादच्या संतवाङ्मयाच्या अभ्यासक श्रीमती मंगलाताई वैष्णव यांचे प्रोत्साहन मोलाचे आहे. सोलापुरातील संगमेश्वर कॉलेजमधील मराठीचे प्राध्यापक श्री. देशमुख सर त्यांची गुणग्राहकता व प्रेरणा वाखाणण्यासारखी आहे.
माझे स्वाध्यायी बंधू-हितचिंतक बाळासाहेब यांची प्रेरणा-सूचना मोलाची आहे.
हे सारं खरं असलं तरी माझ्या कवितेचं रोपटं फुलायला कारणीभूत आहेत, सध्या बीडमुक्कामी असलेले साहित्यिक संतवाङ्मयाचे अभ्यासक, कवयित्री डॉ. सौ. सुहासिनीताई इर्लेकर व त्यांचे यजमान श्री. आण्णासाहेब इर्लेकर.
१९६० पूर्वी धाराशिव (उस्मानाबाद) ला असताना मी प्रत्येक कविता इर्लेकरताईंना दाखवायचो. त्या वाचायच्या व योग्य ती दुरुस्ती सांगायच्या. हे दोघेही प्रोत्साहन द्यायचे.
त्यांच्या प्रोत्साहनामुळेच माझ्या कवितेचा प्रवास येथपर्यंत होऊ शकला. पुस्तकप्रकाशनामागे त्यांची प्रेरणा मोलाची आहे. आणखी एक उल्लेख नाही केला तर मी कृतघ्न ठरेन. माझी अर्धांगिनी सौ. कुंदा. ही माझी प्रत्येक कविता आवडीने वाचते व एखादा योग्य शब्द चपखलपणे सुचवते. ती चांगली वाचक व गुणग्राहक आहे.
कवयित्री व लेखिका डॉ. सौ. सुहासिनीताई इर्लेकर, त्याचप्रमाणे संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक ह. भ. प. दा. का. थावरे आणि पुण्याचे राजेंद्र खेर (यांनी स्वाध्यायाचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावर 'देह झाला चंदनाचा' ही कादंबरी लिहिली. त्याच्या दहा आवृत्त्या निघाल्या. अशा अनेक पुस्तकांचे लेखक राजेंद्रजी खेर) यांचाही अभिप्राय या पुस्तकाला लाभला आहे.
माझे सर्व बंधू यांच्या प्रेरणा माझ्या पाठीशी आहेत. अशा ज्ञात-अज्ञात सर्व हितचिंतकांचा मी ऋणी आहे.
श्री. शे. दे. पसारकर व सौ. उषा पसारकर मार्गदर्शनामुळे व परिश्रमाने 'गीत ज्ञानदेवायन' हे माझे पुस्तक वाचकांपुढे येत आहे. त्यांचा मी सदैव ऋणी आहे. माझे कविमित्र श्री. रा. श्री. पंचवाघ यांचे मोलाचे सहकार्य या कामी लाभले आहे.