अभिप्राय
पंडित नायगावकर यांच्यातील कवीचा जन्म होताना मी पाहिला आहे. उस्मानाबादला १९५५ ते १९६४ च्या सुमारास माझे वास्तव्य होते. पंडित आमच्या समोरच्या त्यांच्या वाड्यातच राहायचे. त्या काळातील उदयोन्मुख कवयित्री म्हणून ते माझ्याकडे यायचे, तेव्हा कवी आणि कविता याविषयीचे त्यांच्या मनातील निर्व्याज आणि उत्कट प्रेम त्यांच्या डोळ्यांत दाटून यायचे.
नायगावकर कविता करीत राहिले. गेली ४०-५० वर्षे ते कविता लिहीत आहेत. त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे ते कविता जगत आहेत. कवितेच्या साह्याने त्यांनी जीवनातील अनेक चढउतार, सुख-दुःखे, स्वप्ने आणि स्वप्नभंग, आशा-निराशा अनुभविली. त्यातूनही त्यांची कविता आपली चिमुकली वाटचाल करीतच राहिली.
आता निवृत्तीच्या काळात त्यांना पुन्हा एकदा कवितेने घेरले आहे. पंडित नायगावकर हे जातिवंत शिक्षक. एकीकडे बालविश्व, दुसरीकडे जीवनातील कठोर वास्तव, पण त्यावर मात करण्याचे सामर्थ्य देणारी आणि शिक्षकाचे सामर्थ्य कृतार्थ ठरण्यास साहाय्य करणारी उच्च नैतिक मूल्ये आणि त्यांचा पाठपुरावा करणाऱ्या संतसाहित्याची अखंड अटळ ठरणारी सोबत इत्यादींतून ह्या पंडिताचा कविपिंड सिद्ध झाला आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या नितळ पारदर्शी कवितेत न पडते तरच आश्चर्य.
ज्ञानेश्वरांच्या सप्तजन्मशताब्दीच्या काळात नायगावकर 'ज्ञानेश्वरी' व ज्ञानेश्वरांच्या अद्भुत चरित्राच्या संस्मृतीने झपाटले गेले आणि त्यातून 'गीत ज्ञानदेवायन' सिद्ध झाले. मात्र 'गीत ज्ञानदेवायन' हे ज्ञानेश्वरांच्या केवळ कथेचाच आश्रय करते असे नव्हे, तर 'ज्ञानेश्वरी'च्या अंतरंगाचाही रसाळपणे वेध घेते. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी, हे समीकरण नायगावकरांनी 'गीत ज्ञानदेवायना'त जोजावले आहे, हे त्याचे वेगळेपण होय. मूलतःच भावोत्कट असलेले ज्ञानेश्वरांचे चरित्र 'गीत ज्ञानदेवायना'त अधिकच रसोत्कट झाले आहे. ही भावकथा स्वतः इंद्रायणी सांगत आहे अशा भूमिकेतून 'ज्ञानदेवायना'चे गीतरूप निवेदन होत असल्याने त्यात अद्भुततेचे रंग दाटले आहेत. पंडित नायगावकरांची वाणी शुद्ध, लेखणी प्रवाही आणि प्रतिभा प्रासादिक असल्याची साक्ष ह्या रचनेत पदोपदी प्रत्ययास येते. उदाहरण म्हणून 'स्वानंद समाधी' ह्या शीर्षकाच्या अखेरच्या गीतातील काही पंक्तीही पुरेशा ठरतील.
…जाहले हो काज । एथले हो आज ।
उकलले गूज । कैवल्याचे ।।
भक्तीचे हो मळे । येथ बहरले ।
अमृतात न्हाले । अवघे जन ।।
...निर्गुण तो आहे। सर्व निराकार।
सृष्टीचा विस्तार । साकारतो ।।
रूप हे विराट । आजि पाहियले।
नवल देखिले । विश्वरूप ।।
…झाले निरूपण । योगक्षेम आता।
त्र्यैलोक्याचा त्राता । साद घाली ।।
आनंदाचे धाम । सज्जनाचे मन।
उद्धरिले जन । सर्व लोकी ।।
...विठ्ठल विठ्ठल । गजर होतसे।
मुक्त तेज होय । कैवल्याचे ।।
टाळ चिपळ्यांची । साथही मिळाली।
एकरूप झाली । एकतारी ।।
…शिळाही लागली । देखता देखता।
होय जगताचा । मार्गदीप ।।
अबीर नि बुक्का । फुले उधळती।
करही जुळती । आपोआप ।।
पंढरीचा राणा । आळंदीस आला।
पाहुनी सोहळा । धन्य झाला ।।
इंद्रायणी काठ । भिजे आसवात ।
होय अंतरात । कासाविशी ।।