१. चैत्रपालवी
चैत्रपालवी चैत्रपालवी
तरुवेलीवर अंकुरली
अशी नवेली निसर्ग किमया
चराचरावर अवतरली
चैत्रपालवी चैत्रपालवी
मनोमनी ही मोहरली,
पर्णफुलांच्या आभरणाने
सृष्टी सारी सुखावली
चैत्रपालवी चैत्रपालवी
नवतेजाने न्हाऊन आली,
सृष्टीचे नव लेणे पाहून
तार मनाची झंकारली
चैत्रपालवी चैत्रपालवी
नवगंधाने मोहरली,
उल्हासाचे वारे पाहून
नव आशा ही पालवली
चैत्रपालवी चैत्रपालवी
सृष्टी सारी बहरा आली,
वसंतातल्या यौवनाला
धुंद कोकिळा साद घाली
१४.४.१९९४
सोलापूर