२. सूर्यदेवा
पहाट झाली, वारा सुटला
आरवलं कोंबडं
उगवतीला डोंगरापल्याड
फुटलं गं तांबडं
रथ सोन्याचा सूर्य देवाचा
उधळित येई गुलाल
निळीशार ती कडा नभाची
झाली लालीलाल
झाडावरच्या घरट्यामध्ये
जाग येई पाखरा
आनंदाने किलबिल करीत
जाय उडत अंबरा
वेलीवरच्या कळ्याफुलांना
उमलत ये गंध
सुगंध पसरे वाऱ्यावरती
वातावरणी मंद
असा आगळा आज उगवला
दिस सोनियाचा
सूर्यदेवा नमन करूया
काया-मने-वाचा
८.११.२००३