४९. संत कबीर
पहाटवेळी एकतारीवर कबीर गाई दोहे
धवल-निर्मळ गंगामाई संथ शांत वाहे
दोह्यामधुनी कबीर सांगे सकला सहिष्णुता
सर्वसंगपरित्यागी हा, आळवी रघुकुलसुता
चर्मचक्षुने अंध जरी हा, अंतर्यामी द्रष्टा
अढळ होती सदैव त्याची रामावर निष्ठा
रामनाम हा घेत मुखाने, विणीत असे शेला
शेला विणता त्याचा अवचित जरा लागे डोळा
भक्तासाठी धावुन येणे ब्रीदच देवाचे
पूर्ण जाहला शेला विणुनी, कार्यच हो त्याचे
राम-रहिम हे दोन नाही, एकच हे सत्य
त्या सत्याला तोडच नाही, बाकी सारे मिथ्य
आयुष्यातील कणकण ऐसे भक्तीने उजळले
दोहे त्याचे अमर होऊनी दर्यापार गेले
असा आगळा संत जाहला गंगेच्या काठी
दोहे त्याचे अजून असती मनुजाच्या ओठी
१७.५.२००४
सोमवार