५०. अजब हे भगवंताशी नाते

भगवंताच्या परिसस्पर्शे पवित्र होय जाते
अजब हे भक्ताचे भगवंताशी नाते...

विठ्ठलवेडा नामदेव हा पंढरपूरनिवासी
राबराबते रात्रंदिन जनी नामयाची दासी
दळणकांडण, धुणीभांडी, उचली कष्टाच्या गोण्या
मुखी बोलते विठ्ठल विठ्ठल, हात थापिती शेण्या
भल्या पहाटे दळण दळिता ओव्याही गाते

अजब हे...

पहाटवेळी दळिता जनीचा जरा लागला डोळा
मदतीसाठी राऊळातुनी आला विठ्ठल भोळा
दळिता दळिता रत्नहार मग अडतो खुंट्याला
उजाडताना घाईघाईत देव राऊळी गेला
असा आगळा देव सावळा जनी आळवीते

अजब हे...

उजाडताना राऊळात मग हाहा: कार झाला
भगवंताच्या कंठामधला हार चोरी झाला
पंढरीतले घर न् घर ते तपासून झाले
हार शोधिता तपासनीसही थकूनिया गेले
परमेशाची अजब लीला कुणा न ते कळते

अजब हे...

दूर राहिले घर नाम्याचे तपासले अंती
रत्नहार तो दिसे अचानक खुंट्याच्या भवती
चोर म्हणोनी जनीस तेव्हा धरूनिया नेती
मी न चोरिला हार देवाचा, जनी ये काकुळती
भक्ताचा तो अंत पाहतो, सारे त्यास कळते

अजब है...

चोर म्हणोनी भर चौकामध्ये उभे तिला केले
रस्त्यावरूनी जाता-येता कुत्सित जन बोले
शिक्षा जनीला कठोर करण्या दोरखंड आवळले
त्या दोरांचे त्वरित रूपांतर फुलांमध्ये झाले
भक्तासाठी धावुन येणे भगवंता कळते

अजब हे...

७.४.२००२,बुधवार
अनुक्रमणिकामागीलपुढील
५०. अजब हे भगवंताशी नाते | सृष्टीचे हे रूप आगळे