८३. सृष्टीचे हे रूप आगळे
सहा ऋतूंचे सहा सोहळे
परमेशाची किमया न कळे,
सृष्टीचे रूपच हो आगळे...
वसंत येता कोकिळ कूजन
सृष्टी सारी येते बहरून,
नववर्षाचे होते पूजन
आनंदी सोहळे...
तरुवेलीवर हिरवी वसने
फुलाफळांनी भरली राने
वसंतागमने सृष्टी अवघी
वैभवात लोळे...
ग्रीष्मामधली आग भडकते
धराती सारी भाजुन निघते
अंगांगाची लाही होते
उदास हो सगळे...
ग्रीष्मानंतर येते वर्षा
पारावार ना मनुज-हर्षा,
कृषीगणांच्या नव-आशांचे
बहरून येती मळे...
शरदामधले धुंद चांदणे
निशिगंधाचा गंध पसरणे
स्फुरता गाणे वदनावरती
हास्य मधुर ओघळे...
हेमंतातील थंडी गुलाबी
वधु-वदनावर फुलते लाली
प्राणप्रिया पाहून प्रीतीचा
गंध मनी दरवळे...
शिशिरामध्ये गळती पाने
तरुवेलीची हरती वसने
उघडी सारी वने उपवने
पान न् पान गळे...
निसर्गनिर्मित चक्र असे हे
अखंड अविरतपणे चालते
ऋतूंमागुनी ऋतूही येती
तत्त्वच ते वेगळे
अद्भुत हे सगळे...!
२८.७.२००५, गुरुवार