८२. या संध्येला त्रिवार वंदन
सूर्य मावळे दिशा पश्चिमा रंग उधळी केशरी
विविध रंगांमध्ये रंगते सांज अशी अंबरी
पीत उन्हाचा फिकट कवडसा झिरपे पानांतूनी
धरणीवरती छाया अलगद येते निळाईतुनी
संध्यारजनी घेऊन येई धुसरशी शाल
त्या शालीतच निवांत होई जग हे विशाल
थकून भागुन रविकर मग तो सागर लंघुनी जाई
कलरव करीत पक्षीगण ते कोटरात येई
गाईगुरे ती धूळ उडवित माघारी येती
गृहिणी माता देवापुढची सांजवात करिती
विश्रांतीस्तव मुले माणसे घराकडे येती
देवापुढती बसून तेव्हा होई शुभं करोती
पवित्र मंगल संध्या ऐसी हवी हवी वाटते
या संध्येला त्रिवार वंदन मनोमनी होते...
१३.८.२००२, मंगळवार