मनोगत
'सृष्टीचे हे रूप आगळे' हा माझा तिसरा कवितासंग्रह.
निसर्गाची अद्भुत किमया, निसर्गाचे बदलणारे रंग म्हणजेच पृथ्वी, आकाश, चंद्र, सूर्य, तारे या साऱ्या साऱ्यांनी माझ्या मनावर मोहिनी घातली. हे आपण रोजच पाहतो. पण माझ्या हळव्या मनाला त्यातलं सौंदर्य भावलं. मला सुचत गेलं, मी लिहीत गेलो. तसंच वृक्ष, वेली, पानं, फुलं, पाऊस, इंद्रधनुष्याचे रंग, श्रावणात धरित्रीत होणारे बदल, हे सारं मला आवडू लागलं.
एस.टी.त बसून परगावी जाताना हिरवी शेतं, सूर्यफुलांची शेती, सूर्यफुलं आपलं तोंड प्रकाशणाऱ्या सूर्याकडेच कसं वळवतात हे पाहून मला आश्चर्य बाटत होतं. पंढरीचा पांडुरंग मला रानात, वनात, जनात भेटल्याचा आनंद होत होता. वारीला पायी जाणारे भाविक भक्त, त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली ओढ हे त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं. तसेच पश्चिम दिशेकडे संध्याकाळी होणारी रंगांची उधळण, हे पाहून मी भान विसरत होतो. ही निसर्गाची अद्भुत किमयाच नाही का? पहाटेची शांत वेळ, मनाला प्रसन्न करणारी प्रभातीची मंगल वेळ, पक्ष्यांचं विहरत जाणं हे मनात साठवत होतो.
ज्या ज्या तीर्थक्षेत्री गेलो तिथला परिसर, भगवंताचे दर्शन हे सारं मनाला स्पर्शून जात होतं. वेरुळची लेणी पाहताना तन-मन हरवून जात होतं.
मला सुचत गेले, मी लिहीत गेलो बस्स! दुसरं काही नाही. या लिहिण्यानं मनाला समाधान लाभत होतं.
माझ्या कुवतीप्रमाणे मी कागदावर उतरवत होतो. निसर्गाबद्दल किती बोलावं? किती लिहावं? ते थोडंच आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो आहे. ते समजून घेण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करणे हे आपलं काम आहे.
डॉ. शे. दे. पसारकर व सौ. उषा पसारकर यांच्या प्रयत्नामुळेच हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे.