अभिप्राय

  सृष्टीचे हे रूप आगळे या काव्यसंग्रहाद्वारे कवीने सृष्टीच्या वेगवेगळ्या रूपांचा सुंदर पुष्पगुच्छ वाचकांच्या हाती दिला आहे. निसर्गाबद्दल त्यांना असणारी ओढ, अंतर्मनातील भावसंवेदना, त्यातून काव्यसुगंधाचा फुलोरा सर्वाहाती द्यावा म्हणून त्यांनी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे. त्यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. कवी नायगावकर विद्यावंत आहेत आणि संवेदनशील अंतःकरण असणारे प्रतिभावंत आहेत. त्यामुळेच त्यांच्याजवळ जीवनाकडे, निसर्गाकडे, सृष्टीकडे पाहण्याची त्यांची अशी एक दृष्टी आहे. सृष्टीची त्यांना भुरळ पडते आणि विनासायास त्यांच्या कविता जन्म घेतात. चैत्राचे वर्णन करताना ते म्हणतातः -

चैत्रपालवी चैत्रपालवी
नवतेजाने न्हाऊन आली
सृष्टीचे लेणे पाहुन
तार मनाची झंकारली

  प्रकट होणं हा निसर्गाचा स्वभाव आहे. कवी नायगावकर वेगवेगळ्या ऋतूंत बहरलेल्या सृष्टीचे मनाला मोहवून टाकणाऱ्या रूपांचे वर्णन 'सृष्टीचे हे रूप आगळे' या कवितांमधून साकार करतात. शरदऋतूतील निसर्गाचे वर्णन करताना ते म्हणतातः-

शरदामधले धुंद चांदणे
निशिगंधाचा गंध पसरणे
स्फुरता गाणे वदनावरती
हास्य मधुर ओघळे

  पाऊस येऊन गेल्यावर सप्तरंगी इंद्रधनुष्य साऱ्या आसमंतात पसरून छटेद्वारे बाळगोपाळांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांना आकर्षित करते. या सात रंगांची छटा नायगावकरांच्या 'रंगबावरी' या कवितेमधून उधळते. ती उधळण ते पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त करतात:-

रंग जांभळा लेऊन जांभुळ
नदीकाठी बैसला
हिरवा मरवा लेऊन सजली
धरणी नव शेला
शेल्यावरची मखमल हिरवी आमोदे डोलली

  सृष्टीच्या सौंदर्याबरोबरच त्यांचे मन भक्तीत रममाण होताना दिसते. पंढरीचा पांडुरंग संत कबीर, शिवशंकर भोळा, उदे ग अंबे उदे, स्वामी समर्थ यांसारखे आराध्य त्यांच्या कवितेचे विषय बनून जातात.

  'समर्था पावन मी झालो' या काव्यातून त्यांची आध्यात्मिक ओढ जाणवते. ते म्हणतात:-

रामनाम हे नाम जपाया
दासा आधी नाम घ्यावया
समर्थ तुमच्या सिद्ध कृपेने
पुनीत मी झालो

  काव्य करण्यासोबत त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. ते म्हणजे त्यांचा आध्यात्मिक विषयात असणारा रस, आणि त्यांचा हा आध्यात्मिक भाव 'गीतेची गोडवी' या कवितेतून

नको नको मना गुंतू मायाजळी
आसक्त मासोळी जीवनी या

  असे प्रकट करताना दिसते.

  नायगावकरांच्या कविता मनाला चैतन्य, आनंद तसेच उत्साह देतात. त्यांच्या कविता वाचून मन प्रफुल्लित होते. सृष्टीची सुंदर रूपं आपल्या कवितांमधून चितारत असतानाच त्यांच्यापासून काय काय शिकता येईल हेही 'कोणापासून काय शिकावे' या कवितेच्या माध्यमाद्वारे सांगतात. ते निसर्गातील फूल, मेघ, दूध, शीतल वारे, खळखळणारी सरिता, हिरवीगार वृक्षलता, अथांग पसरलेला सागर यांचे उदाहरण देऊन म्हणतातः-

नील नभासम
विशाल आणिक
स्वच्छ असावे
अंतरंगही

  नायगावकर म्हणतात, विशाल निळ्या आणि स्वच्छ नभासारखं माणसाचं मनही स्वच्छ व शुभ्र आकाशासम विशाल असावं. भक्तिरसात रंगता रंगता त्यांना धरणीमातेच्या सुंदर रूपाचीही भुरळ पडते आणि अलगद त्यांच्या मनातून कविता स्फुरते. धरतीच्या सौंदर्याचे वर्णन करताना ते सांगतातः -

हिरवा हिरवा नेसून शालू
धरती शृंगारते
हिरव्या रंगामधून तेव्हा
तृप्ती हुंकारते

  नायगावकरांच्या ब्रह्मकमळ, अबोल चाफा, कोरांटी, सूर्यफूल, बदामी पान ह्या कवितांमधून त्यांना असलेली फुलांची आवड कळते. तसेच शर्मिष्ठा, अहिल्या, आसावरी या कविता वाचल्या की त्यांना स्त्रियांबद्दल असलेला आदर लक्षात येतो. नायगावकरांच्या कवितांना नैसर्गिक सुंदरतेची झालर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात विलसत असतानाच त्यांचे मन इंद्रायणीकाठी तरंगून कैलासलेण्याच्या उंच शिखरावर झेप घेते. ज्याप्रमाणे क्षितिजावर सकाळी आणि संध्याकाळी अनेक रंगांची उधळण झालेली दिसते त्याप्रमाणे नायगावकरांच्या कवितांचा रंग मनाला रंगवून जातो. पुन्हा पुन्हा त्यांच्या कविता वाचाव्याशा वाटतात. त्यांच्या कवितासंग्रहाला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

- डॉ. इरेश स्वामी
कवीचे मनोगतपुढील अभिप्राय
अभिप्राय - डॉ. इरेश स्वामी | सृष्टीचे हे रूप आगळे