११. विरहिणी
ही अशीच बसते टेकुनिया मी मान
लावून तुझिया वाटेवरती ध्यान
तळमळते, जळते विरहाग्नीने अंग
येणार कधी तू परतुनिया रे सांग?
हा पिसाटवारा झोंबे सर्वांगाला
ही थंडी गुलाबी स्पार्शुनी जाते गाला
बघ शिशिर नेतो तरुलतिकेची पाने
मम हृदयपाकळी जाय सुकत विरहाने
ये वसंत हसरा, खुणावितो कवणाला?
ती कोकिळ कुहूची साद घालिते त्याला
ही अशीच सरते सख्या चांदणी रात
एकलीच बसते आर्त भैरवी गात
मी वाट पाहुनी थकले श्रमले सजणा
होईन अमर रे आलिंगुनिया मरणा
परी मनात माझ्या येते पिया राहून
जाईल कशी रे कुडी मीलनाहून?
१८.११.१९५९
उस्मानाबाद