१२. तुला पाहिले त्या वळणावर

नायलॉनची झिरझिर साडी
कटोरी चोळी, पाठही उघडी
रस्त्यामधुनी अशी हिंडते
दुरून भासे ओलेती, पण
पदर सदा तो वाऱ्यावर

तुला पाहिले त्या वळणावर...

अंगावरती धावुनी आला
चोपडलेला उग्र दर्प तो,
लचकत् टचकत् अशी चालते
वळवळुनी का कुणा पाहते?
लाल नखांचा हात चाळवी
फीत असता तरी नावरे,
उडत्या केसामधली भुरभुर..

तुला पाहिले त्या वळणावर...

पाहुनी थबके रस्त्यामध्ये
अय्या-इश्श्यची झडली फैरी,
खोटे खोटे हसताना मग
रंगवलेले अनार उघडी
उगीच घाली पदरा आवर

तुला पाहिले त्या वळणावर...

सुटकेसाठी चुळबुळलो, पण
गॉगलमधुनी तिने हेरले
किती अंशाचा कोन जाहला?
गुडबाय की टाटा वदली
पर्स मण्याची गर्रकन फिरली
फट्कारा तो मलाच बसला
अवाक् झालो मीच क्षणभर...!

तुला पाहिले त्या वळणावर...

७.७.१९६२
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
१२. तुला पाहिले त्या वळणावर | भाव मनीचे उमलत राहो