१३. तराणे
गाऊ नको तू गीत
गीतामधुनी उगाच स्मरते अधुरी आपुली प्रीत...
तिन्ही सांजेच्या कातर वेळी
वृक्षलतांना साक्षी ठेवुन
हळव्या शपथा गंधित होऊन
कळ्याफुलासह फुलले होते श्वासाचे संगीत...
भेट आपुली पहिली वहिली
अजून मजला स्मरते ग
कालिंदीच्या तटी पाहिली
वनराणीसम सजली होती, झालो मी पुलकित...
आता कशाला हवे तराणे?
कळून आले खुळे बहाणे
सुरावटीतून आयुष्याच्या उरले ना संगीत...
९.२.१९७८
सोलापूर