१४. नको तेव्हा
नको तेव्हा तरंगते
स्मृती तुझी हृदयात
नको तेव्हा उठतात
वादळेही मनात
नको तेव्हा ऐकू येते
तुझे मधुर संगीत
नको तेव्हा गुंतविते
मन तरल धुंदीत
नको तेव्हा बोलतेस
तू अवखळपणात
नको तेव्हा लाजतेस
निःशब्द तू मनात
नको तेव्हा छेडतेस
मम हृदयसतार
नको तेव्हा सुचवतो
तव अस्फुट नकार
नको तेव्हा निनादती
कंकण तव लयीत
नको तेव्हा झणी येते
स्नेहमय दुलईत
२४.१०.१९५८
उस्मानाबाद