१५. विडा

विडा रंगला विडा
बाई ग, मनास पडला तिडा...

अशाच एका ऐन दुपारी
बसले होते ओसरीवरी,
घेऊन हाती सहज लाविला
नागवेलीचा विडा...

अजाणतेने सारे घडले
नेत्र जरासे सहज वळविले,
दर्पणात मी मला पाहिले
किती रंगला विडा!...

तोच अचानक कुणी पाहिले
पाठीमागुन हास्य उमटले,
बावरले मी, अशी लाजले !
काय जाहले ? कोणा नकळे
वाजे नजरेचा चौघडा...

याच विड्याने किमया केली
मुग्ध मनाची कळी उमलली,
रोमांचित ही काया झाली
अन् लज्जेचा पुरता भरला
कसा अचानक घडा?...

१५.१२.१९७८
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
१५. विडा | भाव मनीचे उमलत राहो