१६. थंडी
सखे ग, मला वाजते थंडी
थंडीसाठी पहाटपासुन उकळत ठेवली हंडी...
अंदाजाने आधण ठेवते
मुठीमुठीने साखर घालते
लागेल तैसा चहाही टाकते
शेग्डीवरती केव्हापासुन सळाळते ग हंडी...
हाती-पायी मोजे लेऊन
गरम लोकरी स्वेटर घालुन
शाल काश्मिरी घेई लपेटुन
अंगी भरते तरी हुडहुडी, रजईस्तव घर धुंडी...
शेगडीवरती जरी निखारा
अंगांगाला झोंबे वारा
पतीवाचुनी नाही निवारा
दातावरती दात वाजती, उडते घाबरगुंडी...
कामामधी ग दिवसही सरला
उसंत नाही जरा जिवाला
अवचित येता स्वारी घराला
निशा भासते प्राणसखी ग आता कुठली थंडी...
१३.१२.१९७७
उस्मानाबाद