१७. मी न कुणाला सांगायाची
मी न कुणाला सांगायाची
बाबा माझे कसे?
रात्रंदिन जे देत साऊली
आम्म्रतरू की जसे!
मी न कुणाला सांगायाची
आई माझी कशी?
अविरत प्रेमळ सुगंध देते
वेल जाईची जशी!
मी न कुणाला सांगायाची
भाऊ माझा कसा?
हाकेसरशी धावुन येतो
कृष्णसखा तो जसा!
मी न कुणाला सांगायाची
ताई आमुची कशी?
सणासुदीला अचूक येते
पुरणपोळी जशी!
मी न कुणाला सांगायाची
बेबी आमुची कशी?
दह्यादुधावर टपून बसते
मनी मॅव ती जशी!
मी न कुणाला सांगायाची
आजी आमुची कशी?
वरून भासे काटेरी पण
गोड फणस ती जशी!
मी न कुणाला सांगायाची
पतिराज ग कसे?
मधुर चांदणे बरसत येते
चंद्र नभीचा जसे!
मी न कुणाला सांगायाची
बाळ माझा कसा?
पापा घेता जणू भासतो
खवा मुलायम जसा!
१९.७.१९८३
सोलापूर