१९. मनात पारवळ घुमतंय का?

तो- मनाचं पारवळ मनात घुमतंय
हसून उगाच लाजतंय का?
मनात पारवळ घुमतंय का?...

ती- वसंत वनात आंब्याच्या राईत
कोकिळ स्वरात,
गाण्यात काहीतरी सांगतंय का?
मनात पारवळ घुमतंय का?...

तो- पुनवेच्या रातीला, चांद ग साथीला
साद माझ्या प्रीतीला
हासत, नाचत देशीला का?
मनात पारवळ घुमतंय का?...

ती- उतरत्या उन्हात, वेळूच्या बनात
हात माझा हातात,
हळुवारपणात घेशील का?
मनात पारवळ घुमतंय का?...

तो- उसाच्या फडात, खुद्कन गालात,
हसून लाडात,
भीड जरा बाजूला सारशील का?
मनात पारवळ घुमतंय का?

ती- काय तुझ्या मनात, गूज माझ्या कानात
बाभूळबनात,
शीळ अशी घुमवत सांगशील का?
मनात पारवळ घुमतंय का?...

तो- गोड गोड गुपित ओठाच्या कुपीत
अमृत शिंपीत,
रंग न्यारा खुलवीत जाशील का?
मनात पारवळ घुमतंय का?...

ती - एकलेपणात भिते मी मनात
गुपित जनात
उघडं आपुलं होईल का?
मनात पारवळ घुमतंय का?...

ऑगस्ट १९७८
अनुक्रमणिकामागीलपुढील
१९. मनात पारवळ घुमतंय का? | भाव मनीचे उमलत राहो