२०. डोंगरची मैना

मी डोंगरची मैना, हाय नावाची रैना
आले घेऊन रूपाचा ऐना,
भल्याभल्याला पाणी पाजिल, नावची मी है रैना,
मी डोंगरची मैना...

कोरीव, कातीव, कायेची कमान, लचकत मुरडत मान
हासत नाचत, चालते गुमान, अंगी हो मोराची शान
नजर फेकीत, साऱ्यांना रोखीत, उडवीत आले मी दैना
मी डोंगरची मैना...

केतकीचा रंग, भरलेलं अंग, सळसळ नागिण जशी
नवथर बिजली, रूपानं सजली, रंभा जणु उर्वशी
मी मी म्हणणाऱ्याला दाविल अस्सल गावरान ईंगा
मी डोंगरची मैना...

हसते गालात, नाचते तालात, पैंजण करिती छुमछुम
चमकी नाकात जोडवी ठेक्यात, बांगडी वाजते खनखन्
आले मी भरात, ऊस जसा पेरात, उसळी उरात माईना
मी डोंगरची मैना...

मदन झोकात, रूपडं लाखात गुपित मनात राहीना
थंडीचा गारवा, मनाचा पारवा घुमता घुमता राहीना
कुणा तरी बोलवा, फुंकर घाला, कळ कशी अजून जाईना
मी डोंगरची मैना...

३.३.१९७८
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
२०. डोंगरची मैना | भाव मनीचे उमलत राहो