२१. कुठे निघाली?

नेसून लुगडी कानात बुगडी
गुल्जार फाकडी कुठे निघाली ग?

नजर वाकडी नथीची काडी
ज्वानीची होडी कुठे निघाली ग?

ओठांची पवळी ही नार कवळी
शेंगच चवळी कुठे निघाली ग?

दंडात वाकी नीटस नाकी
पदराला झाकित् कुठे निघाली ग?

मधाची वाडी हंसाची जोडी
मिरवित् लाडी कुठे निघाली ग?

पायात वाळा अंगात चाळा
लावीत लळा कुठे निघाली ग?

हसण्यात गोडी वागण्यात खोडी
मदन लालडी कुठे निघाली ग?

नवतीची पालवी अंगांग हलवी
साऱ्यांना झुलवित कुठे निघाली ग?

देहाची पालखी हलकी हलकी
यौवन फुलकी कुठे निघाली ग?

होऊन बाधा सोडून धंदा
गवळ्याची राधा कुठे निघाली ग?

मधुर पावरी ऐकुन बावरी
कृष्णाला राधा शोधित निघाली ग?

नंदाचा नंदन करूया वंदन
सुखाचं निधान शारंगपाणी ग!

३.२.१९७८
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
२१. कुठे निघाली? | भाव मनीचे उमलत राहो