२२. लाज

लाज वाटते आज मला ग
लाज वाटते भारी
पहाटवेळी रामप्रहरी
कोण उभे दारी?

दारावरती पडद्याआडुन
सळसळतो पदर
उभारलेल्या आकृतीला
न्याहाळते नजर

नजरभेट ती होता अवचित्
थरथरते पापणी
पापणीत या थरथर होता
अडखळते वाणी

मूकवाणी पण मनातुनी ग
गुणगुणते गाणे,

गाणे कसले? गीत अनोखे
ओठावर येते
ओठामधुनी गीत उमलता
लाज मनी येते

त्या लज्जेचा लाल रक्तिमा
गालावरती खुले
पूर्व दिशेला प्राचीवरती
हास्य जणू ओघळे!

२९.५.२००५ शनिवार
अनुक्रमणिकामागीलपुढील
२२. लाज | भाव मनीचे उमलत राहो