२४. वैशाखाचा उष्ण उन्हाळा

वैशाखाचा उष्ण उन्हाळा
त्यात पोळती अंग झळाळा
अशा क्षणी मग मनात येते
हवा वाटतो मधुतर वाळा

वैशाखाचा उष्ण उन्हाळा
मरगळ येते उगा मनाला,
डोळ्यापुढती आपसुक येतो
सरबताचा मधुर प्याला

वैशाखाचा ऐन उन्हाळा
अंगागाची होती लाही
आम्रतरूच्या छायेची मग
त्रस्त मनाला आठवण व्हावी

वैशाखाचा प्रखर उन्हाळा
जीवाची या तगमग होते
दुपारच्या त्या भकास वेळी
झुळुक गारशी हवी वाटते

वैशाखाचा उष्ण उन्हाळा
नको नको ते मनात येते
आभाळी मग नजर फिरते
झणी वळवाची सर आठवते...

१२.४.१९९४
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
२४. वैशाखाचा उष्ण उन्हाळा | भाव मनीचे उमलत राहो