२५. वासुदेव आला

पहाटवेळी भल्या सकाळी
वासुदेव आला हो वासुदेव आला,
रामप्रहरी तुमच्या दारी
वासुदेव आला हो वासुदेव आला...

मोरपिसांची टोपी लेऊन
लांबच लांब सदरा घालुन
करवतकाठी धोतर नेसुन
मुखाने नाम, हाताने टाळ, वाजवित गर्जत दारी आला...
वासुदेव आला...

अंगरख्यावर कोट तयाचा
थाट त्यावरी उपरण्याचा
डोळ्यावरती चष्मा त्याचा
काखेमध्ये झोळी घेऊन गल्लीबोळ हिंडत आला...
वासुदेव आला...

कुण्या बाप्याचे भविष्य कथितो
ताई-माई मुखे बोलतो
सुखदुःखाचा होरा सांगतो
सुपभर दाणे घेऊनिया मग गजर पिढ्यांचा करू लागला...
वासुदेव आला...

देवदूत जणु भूमीवरचा
दूत खरा हा भगवंताचा
भविष्यकार तो जुन्या काळचा
अवतारच जणू माणुसकीचा, गाव सारा जागवित आला...
वासुदेव आला...

१०.४.२००४
शनिवार
अनुक्रमणिकामागीलपुढील
२५. वासुदेव आला | भाव मनीचे उमलत राहो