२६. अविधवा
देव नाही देव्हाऱ्यात
काय करी पुजारीण?
देव्हाऱ्याला शृंगारिते
म्हणून मी जारीण
बिलोरीच्या आरशीला
जाते जेव्हा सामोरी मी
प्रतिबिंबा पाहूनिया
कालवते माझ्या उरी
लावताना लाल टिळा
हात कसा थरारतो
घालताना पोत गळा
जीव माझा बावरतो
स्वतःच्या संरक्षणा
सुवासिनी अशी होते
पतिराजा स्मरोनिया
अशी जगी वावरते...
मार्च १९६१