२८. लेक येणार माझी

नको येऊस पावसा
असा वेळी-अवेळी
लेक येणार माझी
आज घरी सांजवेळी

नको येऊस पावसा
दिवेलागणीच्या वेळी
आज येणार माझी
लेक लाडकी सावळी

नको येऊस पावसा
धुसमुसळ्यासारखा
लेक हळवी रे माझी
भाव तिचा फुलासारखा

नको येऊस पावसा
असा गर्जत बरसत
तुझ्या भेसूर आवाजानं
मन माझं रे घाबरतं

गर्जणाऱ्या पावसा रे
आता येई तू खुशाल
लेक आली रे घरात
घर नाचे आनंदात...!

जुलै २००४
अनुक्रमणिकामागीलपुढील
२८. लेक येणार माझी | भाव मनीचे उमलत राहो