२९. अंधांचे स्वप्न
सप्तरंगी हे स्वप्न आमुचे
जीवनात या फुलावयाचे
त्या स्वप्नांच्या झुल्यावरती
आनंदाने झुलावयाचे,
पार होऊ दे या अंधारा
सुजनहो, नेत्रदान तुम्ही करा...
अंध जरी आम्ही जन्माने
जाणुनी घेतो स्पार्शाने
डोळे असुनी पहावयाला
वंचित केले नियतीने
मुक्त होऊ दे ही कारा
सुजन हो, नेत्रदान तुम्ही करा...
या अंधाला कशी दिसावी
पूर्व दिशा ती उजळताना?
दिसेल केव्हा अभाग्याला
सूर्य सागरी बुडताना ?
येईल कधि ते भाग्य दारा?
सुजनहो, नेत्रदान तुम्ही करा...
नेत्रामधली ज्योत जागता
प्रकाशमय हो परिसर सारा
नवदृष्टीने पाहू आम्ही
या दुनियेतिल सर्व पसारा
आनंदाने भरून जाईल
मम हृदयाचा गाभारा...!
१३.६.२००५
सोमवार