३०. कठोर मन हे
कठोर मन हे नकळत झाले आज कसे हळुवार
मनाला नसे अंत ना पार...
मनात माझ्या अनेक इच्छा
नको एवढ्या आशा-आकांक्षा
अपेक्षांच्या असीम सीमा
त्या कक्षाला आवर आता, नको करू अविचार
मनाला नसे ना अंत ना पार...
नंदी असतो महेशसन्मुख
गणेशचरणी बसतो मूषक
सर्प राहतो लीन होऊनी
भगवंताच्या भेटीलागी ओढ जिवा अनिवार
मनाला नसे अंत ना पार...
पहाट होता पूर्वा उजळे
अलगद होई नभ मोकळे
तरुवेलीवर किरण कोवळे
पक्षिगणासम मुखी येऊ दे नाम तुझे ओंकार
मनाला नसे अंत ना पार...
स्वैर मनाला वळवी थोडे
वासनेतुनी वासुदेवाकडे
घेई रे सहिष्णुतेचे धडे
अज्ञ मना, तू अध्यात्माचा मार्ग हाच स्वीकार
मनाला नसे अंत ना पार...