३. पत्र

मी पत्र लिहाया बसले
तव नामाशी झरणी अडता खुदकन गाली हसले
मी पत्र लिहाया बसले...

प्राणप्रिया तुज काय लिहू?
सांग कशी सुरुवात करू? लिहिताना बघ मन लागे बावरू
बावरलेली अशी खुळी मी, मलाच नकळत हसले
मी पत्र लिहाया बसले...

पहिली वहिली भेट आपुली
नकळत कैसी किमया घडली! शब्दांवाचुन प्रीत अबोली
अबोलीचा तो रंग गुलाबी गालावरती खुले
मी पत्र लिहाया बसले...

तुझी नि माझी प्रीत निराळी
अन् स्पर्शाची गोड नव्हाळी, थरथरते बघ अधरपाकळी
पाकळीतल्या मधुगंधाचे वेड जिवा लागले
मी पत्र लिहाया बसले...

उपाय माझे सारे सरले
कितीक कागद वाया गेले
नेत्र वेडीचे भरून आले, मम नयनांच्या दर्पणात रे तुलाच मी पाहियले
मी पत्र लिहाया बसले...

प्रिया मजला तुझ्यावाचुनी
अन्य काही रुचतच नाही
अवाक्षरही सुचतच नाही
म्हणून कारे मजवर अवघे शब्दच ते रुसले?

मी पत्र लिहाया बसले...

५.१२.१९८०
अनुक्रमणिकामागीलपुढील
३. पत्र | भाव मनीचे उमलत राहो