४. मेंदी
साजण माझा दूर देशी ग, राहू कशी आनंदी?
सयांनो, लावू नका मज मेंदी...
हिरवा-हिरवागार मखमली शेला लेऊन नटली धरणी,
पर्ण-फुलांच्या आभरणांनी गंधित झाली ती पुष्करणी
या आनंदा कशी साहू ग, चाफ्यावाचुन ही जास्वंदी
सयांनो, लावू नका मज मेंदी...
निळा-जांभळा शालू नेसुन सुवासिनी त्या पुजेस जातिल
हिंदोळ्यावर बसून कोणी ललना सुंदर गाणी गातिल
या सौख्याला आज पारखी
सयांनो, लावू नका मज मेंदी...
ओला श्रावण तृप्त धरा ही, कशी राहू ग शांत जराही
श्रावणातली रात अशी ही एकलीच मी सोशी ग
वेडा श्रावण मुक्त बरसता मीच मनाने झाले बंदी
सयांनो, लावू नका मज मेंदी...
हातावरती काढू नका ग सुंदर नक्षी, आरक्त कमळे
भरून येतील नेत्रदळे ग! सख्याविना ते कुणा कळे?
रंगणार ना माझी पंचिम, माझ्यावरती रुसली मेंदी
सयांनो, लावू नका मज मेंदी...
१६.८.१९७८