३२. फळबाजार
चला चला रे सर्व मिळोनी
फळबाजारी चला
सोलापुरच्या मंडईतली
फळे घेऊया चला
नागपुराहुन आत्ताच आली
संत्री ही नारंगी
घोलवडचे चिकू पाहुनी
तोंडा ये पाणी
गोदावरीच्या नाशिकचे हो
द्राक्षे कितीतरी गोड!
वसईची ही केळी मोठी
पाहुन घ्याहो घड
लालभडक ते खट्टे-मीठे
पेरू लालबागेचे
रसाळ भारी सीताफळे
ही आली दौलताबागेची
कोकणातले काजू आणखी
नारळ-फणस ताजा
रत्नागिरीचा हापूस वदतो
सर्व फळांचा मी राजा...!
मे १९८०