३५. चांदणी वरात
काल रात्री मी सहज पाहिली
एक अजब वरात
वरातीत त्या अगणित होती
दिव्यांचीच साथ
फुलाफुलांनी सजला होता
रथही अश्वांचा
रथामाजी त्या बसला होता
जोडा वर-वधूचा
कणखर हाती बांधियलेले
होते कंकण
मृदुल करातिल हिरवा चुडा
करितो किङ्किण्
सलज्ज लज्जा पदराआडून
होती सुस्मीत
त्याच स्मिताला निरखित होती
रांगडीच प्रीत
वरात गेली, सूर अनामिक
अस्फुट ये कानी
दिव्याअभावी लक्ष वेधले
माझे नभांगणी
आकाशगंगा जणु भासली
दिव्यांचीच रांग
लक्ष लक्ष ताऱ्यांचे कैसे
चमचमते अंग
रातकिड्यांची साथ जणूं की,
गमते मज सनई
त्या सनईच्या सुरासवे हो
मन गाणे गाई
अशीच घडली काल अकल्पित
निसर्गसोबत
आणि अशी पाहिली एक अनोखी
चांदणी वरात...!
७.१२.१९८१