३६. वर्तमानात जगायचे आहे
मी मलाच म्हटले होते
मागे वळून पहायचे नाही,
आणि मनात योजले होते
असे उदास व्हायचे नाही
मी मनास बजावले होते
अर्ध्यावरून परतायचे नाही
वेड्या मनास समजावले होते
असे अधीर व्हायचे नाही
मी मनास ठणकावले होते
नको ते आठवायचे नाही,
अन भूतकाळाच्या ऐन्यात
पुन्हा डोकवायचे नाही
मी मनात ठरवले होते
क्षितिजापार पहायचे नाही,
गूढ भविष्याच्या पिंजऱ्यात
उगी अडकायचे नाही
शेवटी ठाम निश्चित केले
बाकी सारे विसरायचे आहे,
स्वच्छ नीलाकाशासारखे
वर्तमानात जगायचे आहे
२.५.१९९८