३७. शेत हिरवेगार
शेत हिरवेगार गऽऽ शेत हिरवेगार
पाहू साजणी बांधावरुनी धरतीचा शृंगार...
शेत हिरवेगार...
गहू, हरभरा, उभा जोंधळा
करडी कांटेदार
गवार भेंडी उभी बाजूला
वांगी काळीशार गऽऽ शेत हिरवेगार...
कांदे, बटाटे, फ्लावर, कोबी
गड्डे अपरंपार
लाल टमाटे, गाजर मुळा
मिरचीला ये बहार गऽऽ शेत हिरवेगार...
गोड काकडी, लाल तोंडली
घोसाळी चवदार
बांधावरती दुधी भोपळा
आडदांड फार गऽऽ शेत हिरवेगार...
आंबट चूका, कवळी मेथी
कोथिंबीर हळुवार
शेंग उन्हाळी वाफ्यामधुनी
खुणविते ग फार गऽऽ शेत हिरवेगार....
फड उसाचा तुऱ्यासी आला
कांडे पेरेदार
घरा लक्ष्मी देत सुखाने
तृप्तीचा हुंकार गऽऽ शेत हिरवेगार...
मार्च १९९९