३८. भारत आमुचा छान

भारत आमुचा छान,
होऽऽ भारत आमुचा छान,
ध्वज तिरंगा फडकत राहुन दाखवी आपुली शान...

खडा हिमालय रिपूपासुनी
मायभूमीचे रक्षण करण्या
पायाजवळी सदैव राहुन सागर गातो गान...

ऋषिमुनींसह पंचनद्याही
गंगा-यमुना पूज्य त्यातुनी
सेवेसाठी सदाच करिती जीवन आपुले दान...

चराचरातुन इथेच घुमली
ज्ञानेशाची पावन वाणी
युगानुयुगे अशी नांदते संस्कृती एक महान...

सह्याद्रीचा कातळ बोले
शिवरायाची शौर्यगाथा
जिजाऊच्या त्या ध्येयापुढती सदैव होई विनम्र मान...

शिल्प अहिंसा दावी सकला
अद्भुततेचे धाम
वेरुळातुनी गमते, शब्द-रंग-रूप-रस-ज्ञान...

झाशीवाली होई धुरंधर
मंडालेचे झाले मंदिर
क्रांती-शांती इथेच वदली स्वातंत्र्याचे गान...

ताज सांगतो यमुनेलाही
दिव्य प्रीतीचे गान,
उंच गोपुरे पवित्र क्षेत्रे उन्नत करिती मान...

सत्य-अहिंसा तत्त्व जगाला
गांधीजी तर सांगुन गेले
भारत वदला एकमुखाने जय जवान जय किसान...

२२.८.१९६७
अनुक्रमणिकामागीलपुढील
३८. भारत आमुचा छान | भाव मनीचे उमलत राहो