३९. जय महाराष्ट्र

जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
कडेकपारी सुखे नांदतो, खंदा स्वाभिमान राजा
जय जय महाराष्ट्र माझा...

सहय गिरीच्या कणाकणातुन
गिरीकंदरी दरीदरीतुन
महानदी अन् सान झऱ्यातुन
सृष्टीमधुनी अखंड चाले, मानवतेची महान पूजा...

या मातीतुन सदैव फुलते
देशभक्तीची ज्वलंत स्फूर्ती
शौर्याची संगीन गरजते
अंती लाभे दिगंत कीर्ती
कीर्तिशिखरावर आरूढ होऊन, एकदिलाने सारे गर्जा...

दिशादिशांतुन इथेच घुमली
शूरत्वाची बुलंद गाणी
पाजियले गनिमांना त्यांनी
भीमथडीचे जिवंत पाणी
पाण्यामधुनी तरंग उठती, गर्जा महाराष्ट्र माझा...

मुंबईतला उसळे सागर
पुण्यपुरीचा बिथरे नागर
शौर्याची ती शर्थ जाहली
बलिदानातुन क्रांती घडली
थेंबामधुनी शब्द उमटती, गर्जा महाराष्ट्र माझा...

महन्मंगल दिवस आजचा
क्षण अलौकिक आनंदाचा
अद्वितीय जणु स्वर्गच साचा
महत्प्रयासे मुक्त जाहला महाराष्ट्र माझा...

१.५.१९७९
अनुक्रमणिकामागीलपुढील
३९. जय महाराष्ट्र | भाव मनीचे उमलत राहो