४०. हिरा जन्मला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
हिरा जन्मला प्रकाश त्याचा दुनियेवर पडला
अंधाराला दूर कराया सूर्य नवा आला...
पंकी फुलते कमल, त्यापरी आपत्तीत फुलला
पीडित जनांना मनोमनी हा बुद्ध नवा भासला...
भीमराव हे नाव घेऊनी भीमपराक्रम करी
माणसातल्या माणुसकीला आव्हानच हा करी...
सातसमुद्रापलीकडे हा जाऊनी चिंतन करी
विषमता ती दूर कराया मार्ग नवा आचरी...
जोतिबाच्या मार्गावरूनी वाट चालतो असा
जनी मानसी सद्भावाचा झणी उमटवी ठसा...
अज्ञ मनाला, दीन जनाला उजेड दाखविला
वादळातल्या नौकेला जणु दीपस्तंभ भासला...
शिल्पकार हा घटनेमाजी मान्य जगी जाहला
सुपुत्रास या पाहुन सारा देश धन्य झाला...
असा आगळा जगावेगळा हिरा इथे जन्मला
घन तमाला उजळायाला सूर्य नवा आला...
१४.४.१९७५