५. फुलवात

मंदिरात मी लावित होते सांजवेळी फुलवात
ज्योत लाविता कसा अचानक सुटला वादळवात !

काही केल्या लागेना ग पेटीतिल गुलसडी
किती वेळ मी अशी ओणवी डावा हात जुडी

त्याचक्षणी तू दर्शनास्तव मंदिरात आला
दीप लावण्या सहकाराचा हातही तूच दिला

दीपासम ती नवी पेटली स्नेहज्योत अंतरी
मधुरस्मिताने अधरपापणीसह थरथरले मी उरी

दर्पणात मी सहज पाहता मलाच येते हसू
मंदिरातल्या पारावरती नजीक केव्हा बसू?

काय जाहले मजला नकळे अशी कशी गुंतले?
उगी राहते हाती धरोनी सैरभैर कुंतले

अशी आगळी जगावेगळी झाले वेडीपिशी
मंदिरातल्या मधू स्मृतीतच सरते सारी निशी

सांजवेळी तू येशील म्हणुनी जाते मी मंदिरात
जीवनसाथी बनून केव्हा फुलवशील फुलवात?

७.१२.१९७९
अनुक्रमणिकामागीलपुढील
५. फुलवात | भाव मनीचे उमलत राहो