४१. मानवतेचा पुजारी

पुण्यनगरी दोन प्रहरी
तहानेल्या दिधले पाणी
जोतिबा तो पुण्य महात्मा, वदली जनतेची वाणी...

अनेक शतके दुबळी जनता
पडली होती अंधारात
हाती धरोनी जोतिबाने
जागविली ज्ञानाची ज्योत
सर्व मिळोनी नमू त्याजला आणि आठवू ती कहाणी
सनातन्यांच्या हौदामधले दलितांना दिधले पाणी...

कन्याशाळा काढुन पहिली
विक्रम त्यांनी हो केला
शिकविण्यास सावित्री जाता
जीव नकोसा हो केला
कर्मठ जन ते खडे मारिती, रोधिती ना त्यांना कोणी
पत्नी फुल्यांची खरी शोभली, अबलांना करिते शहाणी...

दलितांच्या प्रगतिस्तव झटला
होऊनी त्यांचा कैवारी
जनसेवेस्तव देह झिजवी हा
मानवतेचा पुजारी
जीवन ज्यांचे घडले ऐसे, गाऊया त्यांना गाणी
ज्ञानेशाची भूमी वदली, धन्य फुल्यांची ती करणी...

२६.१२.१९६२
अनुक्रमणिकामागीलपुढील
४१. मानवतेचा पुजारी | भाव मनीचे उमलत राहो