४२. मानवतेचा शिल्पकार

बाबा गेले सकलांमधुनी
देहधर्म हा जाता त्यजुनी
शब्द न येती ओठामधुनी
अडते हो वाणीऽ माझीऽऽ
अडते हो वाणी...

अंधाराला दूर कराया
तेजोमय जणू सूर्य प्रकटला
त्या सूर्याला ग्रहण लागता
नयना ये पाणी, माझीऽऽ
अडते हो वाणी...

महाडमधली अमर कहाणी
अमृत झाले तेथिल पाणी
आठवणीने सत्कार्या त्या
नयना ये पाणी, माझीऽऽ
अडते हो वाणी...

बोट बुडाली, शब्द ऐकुनी
दिङ्मुख झाली त्यांची वाणी
ग्रंथप्रेम ते पुत्रावाणी..
झरला मेरुमणी, माझीऽऽ
अडते हो वाणी...

दलितांसाठी बाबा आमुचे
रात्रंदिनही झटले साचे
माणुसकीचा महामेरु तो
धन्य होय धरणी, माझीऽऽ
अडते हो वाणी...

शिल्पकार हा मानवतेचा
ना साक्षात्कारच दिव्यत्वाचा
त्या दिव्यत्वे कर हे जुळती
अवचित मनोमनी, माझीऽऽ
अडते हो वाणी...

६.१२.१९७९
प्रसिद्धी : दै. संचार, सोलापूर, ६ डिसेंबर १९७९, आंबेडकर निर्वाण दिनानिमित्त अग्रलेखात
अनुक्रमणिकामागीलपुढील
४२. मानवतेचा शिल्पकार | भाव मनीचे उमलत राहो