४५. भाग्यवती
भाग्यवती मी भाग्यवती
पुत्रवती मी पुत्रवती
मातृत्वाच्या अमृतात हे मनमानस डोलती...
गोडगोजिरे रूप साजिरे
गोविंदासम बाळ सावळे
जगात येता घेऊन आले नवनवीन नाती...
गाल गुलाबी विशाल डोळे
हातपाय मऊ ओठही पवळे
जावळ कुरळे भाळावरले मजला लोभावती...
आज जीवनी धन्य जाहले
सारे सात्त्विक भाव उमलले
स्पर्शसुखाने हृदयामधुनी अमृतधारा झरती...
४.८.१९७४