४६. वात्सल्य
आज माझ्या अंगणात
उगवला चांद मोठा
चला गडे खेळू आता
आनंदाला नाही तोटा!
सवंगड्यासमवेत
खेळा झाली सुरुवात
बालमना कळली ना
सरलेली चांदरात
आईबाबा सांगताती
खेळ पुरे रात्र झाली
सवंगडी शोधण्याची
आता माझी पाळी आली
अवि, बंड्या, शशी, रवि
धावताती, लपताती
पळताना सापडली
अवखळ वसुमती
विजयाच्या आनंदात
मन वेडे गुंग झाले
चांदोबाच्या प्रकाशात
मुख कसे तेजाळले!
वात्सल्य ते ओथंबुनी
भान सारे हरपली
चुंबनाच्या वर्षावात
रागवाया विसरली
एप्रिल १९९५